सोलापूर,दि.३१: Maratha Mumbai Andolan: परिस्थिती गंभीर पण मराठा खंबीर असे म्हणावे लागेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात २९ अॅागस्टपासून उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सतत पाऊस पडत असतानाही मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.
मुंबईत पहिल्या दिवशी आंदोलकांचे प्रचंड हाल झाले. सर्व दुकाने, वडापाव स्टॅाल बंद होते. मात्र तरीही आंदोलकांनी मुंबईत ठाण मांडले आहे. नंतर आता खाऊ गल्ल्या, दुकाने सुरू करण्यात आली. मात्र बिकट परिस्थितीतही मराठा आंदोलक नाचत जल्लोष करताना दिसून येत आहेत.
आझाद मैदानात पोलिसांनी फक्त पाच हजारच आंदोलकांना परवानगी. त्यामुळे मराठा आंदोलक हे मुंबई महापालिका, रेल्वे स्टेशन, मंत्रालय परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच अनेक ठिकाणी छावा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॅाग “हुजूर मराठे आ गए” फलक देखील पाहायला मिळत आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात अनेक ठिकाणी “हुजूर मराठे आ गए” असे लिहिलेले बॅनर पाहायला मिळत आहेत.