मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली आंदोलनाची पुढची दिशा

0

अंतरवाली सराटी,दि.25: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात समाज बांधवांशी संवाद साधला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी समाजासोबतच राहणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले.

आपल्यासमोर तीन पर्याय

मराठा समाजाच्या मागणीबाबत राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतचा अवधी दिला असून त्यानंतर आपण सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले. आरक्षणासाठी सातत्याने लढावे लागणार आहे. सरकार पलटले, तर आपल्यासमोर तीन पर्याय राहणार आहेत. आपण पुन्हा मुंबईला जाऊ. त्यावेळी तुम्ही म्हणाल तेव्हाच मी बाहेर येणार. दुसरा पर्याय त्यांचा पूर्ण टांगा विधानसभेत उलटवायचा आणि तिसरा पर्याय 288 जागा लढायच्या का पाडायच्या याचा निर्णय 13 तारखेनंतर घेऊ, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला. गावखेड्यातील मराठा-ओबीसी घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केले.

तुझा टांगा उलटवणार

आपल्या विरोधात कितीही जातीभेद केला, तरी आपण जातीवाद करायचा नाही. अंतरवलीतील सगळा समाज आपला आहे, अंतरवलीच्या आजूबाजूला जे गावं आहेत, ते आपले शिव भाऊ आहेत. त्यांनाही दुखवायचे नाही. दंगली घडविण्याचे छगन भुजबळ यांचे स्वप्न मराठ्यांनी पूर्ण होऊ द्यायचे नाही. तो येवल्याहून आला तो भांडण लावेल, दंगली करेल आणि निघून जाईल, असे म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा लक्ष्य केलं. गाव खेड्यातील ओबीसी मराठा एक आहे. छगन भुजबळ, छगन भाऊ तुझा असा इंगा जिरवतो, बेट्या, तुझा टांगा उलटवणार. तू जेवढं करशील तेवढे मराठे एक होत आहेत, असे म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा बोचरी टीका केली.

ओबीसीला आरक्षण 1967 ला मिळाले. उर्वरितांना 1990 ला मिळाले. परंतु, आम्हा मराठ्यांना 1884 पासून म्हणजे दीडशे वर्षांपूर्वीपासून कुणबी हे ओबीसीत आरक्षण आहे. 83 क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे 2004 चा जीआर दुरुस्त करा आणि सरसकट आरक्षण द्या. निजामकालीन गॅझेट लागू करा, सातारा संस्था, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करा. सगेसोयऱ्याची व्याख्या आमच्या मागणीनुसार घ्या आणि नंतरच अंमलबजाणी करा. शासन मला, समाजाला बदनाम करण्याचा डाव टाकेल, तुम्ही सावध राहा, असे आवाहन करीत 6 ते 13 जुलै दरम्यान शांतता जागृती रॅली काढणार असल्याचेही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here