जालना,दि.21: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दंगल घडवण्यासाठी सरकारने ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केल्याचा आरोप केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळावर टीका केली. शिष्टमंडळ दोघांची फजिती करत असून, आम्हाला पाणी पाजून फसवलं असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.
“जातीयवाद मी होऊ देणार नाही. जातीयवाद आणि दंगल घडवण्यासाठीच ही आंदोलनं उभी केली जात आहेत. मी ही लढाई होऊनच देणार नाही. गाव खेड्यातील एकाही ओबीसी, मराठा बांधवावर मी हात पडू देणार नाही. वेळ पडली तर मी एखादं पाऊल मागे घेईन. पण सरकारचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. सरकारला जिंकू देणार नाही म्हणजे नाही,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठ्यांना बुडवायला निघाला…
पुढे ते म्हणाले आहेत की, “तुम्ही सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करु नका, मग मी बघतो. तुम्ही माझ्या मराठ्यांना बुडवायला निघाला आहात ना, नाही तुम्हाला बुडवलं तर नाव बदलून ठेवेन. सगळं सरकारच बुडवून टाकेन. माझ्या जातीपुढे कोणालाच ऐकणार नाही. माझ्या जातीला मरु देणार नाही. मी जोवर जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांवर अन्याय कसा होतो पाहतो”.