१५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा ते ४०० रुपयांत गॅस सिलिंडर, BRS चा जाहीरनामा प्रसिद्ध

0

हैदराबाद,दि.१५: तेलंगणात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे की, पुन्हा सत्तेत आल्यास पक्ष प्रति कुटुंब १० लाख रुपयांच्या अनुदानासह ‘दलित बंधू’ योजना सुरू ठेवणार आहे. तेलंगणातील ९३ लाख बीपीएल कुटुंबांना केसीआर विमा योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा विमा मिळेल. तर सामाजिक पेन्शन पाच हजार रुपये प्रति महिना केली जाईल. सध्याच्या २०१६ रुपयांत हळूहळू वाढवून पाच हजार रुपये प्रति महिना केले जाईल, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

याचबरोबर, अपंगांसाठी सामाजिक सुरक्षा पेन्शनपर्यंत वाढविली जाईल. ही रक्कम सहा हजार रुपयांपर्यंत असेल. याशिवाय, रायथू बंधू योजना हळूहळू वाढवून प्रतिवर्ष १६,००० रुपये केली जाईल, सध्या त्याची रक्कम १०,००० रुपये आहे, असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. तसेच, बीआरएसने सर्व बीपीएल कुटुंबांना ४०० रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. बीआरएसच्या जाहीरनाम्यात सर्व पात्र लोकांना 15 लाख रुपयांचे आरोग्य कवच देण्याचे आश्वासन दिले आहे.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

१) तांदूळ खरेदीचे धोरणही कायम राहणार आहे.
२) नवीन ‘सौभाग्य लक्ष्मी योजने’ अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) महिलांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा.
३) हैदराबादमध्ये सरकारच्या 2BHK धोरणांतर्गत 1 लाख डबल बेडरूमचे बांधकाम.
४) आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा बांधल्या जातील.
५) काही कनिष्ठ शासकीय महाविद्यालयांचे निवासी महाविद्यालयात रूपांतर केले जाईल.
६) राज्य सरकार अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांना ‘राज्याची मुले’ म्हणणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here