“ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद” मल्लिकार्जुन खरगे 

0

नवी दिल्ली,दि.29: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांची माहिती X वर पोस्ट करत दिली आहे. खरगे म्हणाले, “सर्वप्रथम, मी वायनाडमधील प्रियंका गांधी जी आणि नांदेडमधील रवींद्र वसंतराव चव्हाण यांचे लोकसभेतील विजयाबद्दल अभिनंदन करतो. राज्यातील सर्व विजयी काँग्रेस उमेदवारांचे अभिनंदन.”

“मित्रांनो, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने नव्या उमेदीने पुनरागमन केले होते. मात्र त्यानंतर 3 राज्यांचे निवडणूक निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. इंडिया आघाडीतील पक्षांनी 4 पैकी 2 राज्यात सरकार स्थापन केले. पण आमची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होती. भविष्याच्या दृष्टीने हे आमच्यासाठी आव्हान आहे.” असे खरगे म्हणाले.

निवडणुकीच्या निकालातून आपण ताबडतोब धडा घेऊन संघटनात्मक पातळीवर आपल्या सर्व कमकुवतपणा आणि उणिवा सुधारायला हव्यात. हे निकाल आमच्यासाठी संदेश आहेत. असे खरगे यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

पुढे ते म्हणाले, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी पुन्हा पुन्हा सांगतो ती म्हणजे परस्पर ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरुद्धची विधाने यामुळे आपले खूप नुकसान होते. जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढणार नाही आणि एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही, तोपर्यंत विरोधकांना टक्कर कशी द्यायची?

ईव्हीएमवर म्हणाले…

ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद झाली आहे, असे माझे मत आहे. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे त्याबद्दल जितके कमी बोलता येईल तितके चांगले. मात्र देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. ही जबाबदारी कितपत पार पाडली जात आहे, असे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत.

अवघ्या 6 महिन्यांपूर्वी लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागलेल्या प्रकारानंतर विधानसभेचा निकाल राजकीय पंडितांच्याही समजण्यापलीकडचा आहे. असे परिणाम समोर आले आहेत की कोणीही त्याचे समर्थन करू शकत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here