बारामती,दि.6: Sharad Pawar On Ajit Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शनिवारी बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्याविषयी चालेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. काही लोकांना फक्त काम करण्यात इंटरेस्ट असतो, तर काही लोकांचा वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याकडे कल असतो. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत हे बऱ्याचशा पत्रकारांना माहीत आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी सुरू असणाऱ्या चर्चांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.
अजित पवार यांचा स्वभाव लक्षात घेता ते… | Sharad Pawar On Ajit Pawar
पवार पुढे म्हणाले, अजित पवार यांचा स्वभाव लक्षात घेता ते कामाला प्राधान्य देतात. ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. दुसरी गोष्ट राजकारणात अथवा इतर कोठेही आपण एकमेकांना भेटतो. हे भेटणे म्हणजे त्याची राजकीय चर्चा होऊ शकत नाही. माझी विनंती आहे, अजित पवार यांच्या संदर्भात कोणतेही चुकीचे वृत्त पसरवू नका. ते त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालावर म्हणाले… | Sharad Pawar
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसवर काय निर्णय येणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे सरकार पडेल, असे दावे केले जात आहेत, पण शरद पवारांनी मात्र वेगळं मत मांडलं आहे.
निकाल काहीही लागला तरी विधानभवनामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल गेला तरी बहुमत त्यांच्याकडे आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.
विरोधकांच्या एकजुटीवर पवार यांनी वेधले लक्ष
देशात भाजपविरोधी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत देत विरोधकांच्या एकजुटीवरही पवार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, युती करण्यासाठी विविध विचारांचे सामाईक कार्यक्रम घेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तरच विरोधकांची एकजूट होईल. यासाठी आज नितीशकुमार काम करीत आहेत. आणखी काही लोकांचे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांना प्रोत्साहित करणे, सहकार्य करणे महत्त्वाचे आहे. पण हे लवकर केले पाहिजे. कारण निवडणुका जाहीर झाल्यावर सर्व लक्ष तिकडे केंद्रित होते. त्याच्यापूर्वी पर्यायी लोकांना आपण उभे करण्याची आवश्यकता आहे. या कामात नितीशकुमार यांच्यासह आणखी लोक काम करीत आहेत. त्यांना सहकार्य करणे, प्रोत्साहित करणे, मदत करणे त्यात माझाही सहभाग असेल, असे पवार यांनी सांगितले. राज्यभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.