Home महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय; पुढील आठवड्यात मुसळधार हजेरीचा अंदाज

महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय; पुढील आठवड्यात मुसळधार हजेरीचा अंदाज

0

मुंबई,दि.८: गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या हवामान बदलांमुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढणार

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ते २० ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. त्यानंतर २० ते २७ ऑगस्ट या कालावधीतही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

दक्षिण-पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याच्या प्रभावामुळे पुढील २४ तासांत वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचा थेट परिणाम राज्यातील पावसाच्या पुनरागमनावर होणार आहे.

महाबळेश्वरमध्ये पावसाची पाच हजार मिमीची ओलांडली सीमा

प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत ८२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यासह चालू पावसाळी हंगामात महाबळेश्वरमधील एकूण पावसाने ५,०१६ मिमीचा टप्पा पार केला आहे.

इतर राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच केरळ, किनारपट्टी व दक्षिण कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.