Home सोलापूर वार्ता जेसीबीने रस्ता केला उद्ध्वस्त, रहिवाशांचा रस्ता बंद अन्‌ जीवन अस्तव्यस्त!

जेसीबीने रस्ता केला उद्ध्वस्त, रहिवाशांचा रस्ता बंद अन्‌ जीवन अस्तव्यस्त!

0

सोलापूर,दि.८: जुळे सोलापूर येथील गणेश बिल्डर्स स्किम नं ३ परिसरातील रस्ता जागेच्या जुन्या वादातून जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत असून, त्यांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. गणेश बिल्डर्स सोसायटी चेअरमन ॲड. नीता जोशी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बिल्डर्सच्या शेजारील जागेचे मालक सागर संतानी यांनी यापूर्वी शेजारील सोसायटीचा रस्ता बंद केल्याने वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी संबंधित सोसायटीतील नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गणेश बिल्डर्स सोसायटीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीला लागून असलेल्या मंजूर रस्त्याच्या जागेवरही संबंधित व्यक्तीने अतिक्रमण करून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता.

हा वाद विकोपाला गेल्यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीवर येथील नागरिकांनी बहिष्कार टाकला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी बहिष्कार मागे घेत मतदान केले होते. तरीही हा प्रश्न सुटला नाही.

सोसायटीतील या वादा संदर्भात आज गणेश बिल्डर्स सोसायटीने दैनिक संचारच्या पहिल्या पानावर जाहीर नोटीस दिली आहे. असे असतानाही, आज (दि. ८) सकाळी संबंधित व्यक्तीच्या लोकांनी जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण रस्ता उखडून टाकला. यामुळे नागरिकांना स्वतःच्या घरात जाणे-येणे अशक्य झाले आहे. सोसायटीच्या चेअरमन ॲड. नीता जोशी यांनी तत्काळ पोलिस प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली. मात्र, पोलिसांची भूमिका बघ्याचीच राहिली. रस्ता उखडण्याचे काम सुरू असताना पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून विरोध दर्शवला नाही. उलट, “पोलिस ठाण्यात सर्व कागदपत्रे घेऊन या, मग बघू,” असे सांगून ते निघून गेले. तोपर्यंत संपूर्ण रस्ता उखडून झाला होता. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.