मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे फडणवीस आणि भुजबळ यांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य 

0

जालना,दि.22: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारवर विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

धनगर आणि धनगड एकच आहेत तर…  

मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनीच खोडा घातला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही यावेळी मनोज जरांगे यांनी केला. ओबीसी समाजाने आंतरवालीतच उपोषण करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी केला. आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. धनगर आणि धनगड एकच आहेत तर मराठा आणि कुणबी वेगवेगळे कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. मराठ्यांवर प्रचंड अन्याय सुरु आहे. मिडिया याला साक्षीदार आहे. आम्ही ओबीसींच्या विरोधात लढत नाही. आमचे रस्तेच बंद करण्यात आले आहेत. आम्ही जर हे केले असते तर आम्हाला म्हणाले असते आम्ही वाळीत टाकलं आहे. देवेंद्र फडणवीसांना आता शेवटची संधी आहे, पुन्हा बोलायला जागा राहणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारले आहे. हे जर मराठा समाजाने केले असते तर छगन भुजबळ यांनी किती थयथयाट केला असता असे जरांगे म्हणाले. आता सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मराठा करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला. आता आमचे रस्ते बंद केलेत, काही दिवसांनी आम्ही देखील तुमचे रस्ते बंद करु असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंमलबजावणी केल्याशिवाय हे आमरण उपोषण सुटणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

माझी प्रकृती खालावली आहे. काही बरेवाईट झाले तर राज्यात भाजपला नेस्तनाबूत करा, देवेंद्र फडणवीस पुन्हा राजकारणात दिसता कामा नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here