सांगली,दि.6: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या लोक माझे सांगती भाग दोन या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. शरद पवार यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना धक्का बसला होता. मात्र नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील यांच्या या गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
काय म्हणाले जयंत पाटील? | Jayant Patil
शरद पवारांचा राजीनामा कायम राहण्यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसले होते. राष्ट्रवादीपासून शरद पवार बाजूला गेले असते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला देखील जोरदार टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईल म्हणणे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या चाळीस आमदारांनी राजकीय आत्महत्या केली आहे. पुढील निवडणुकांमध्ये निवडून येत नसल्याचं चिन्ह दिसताच आता भाजपकडून इतर पक्षाचे लोक फोडण्याचं काम सुरू असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी बारसू रिफायनरीवरून देखील सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर बारसूला स्थानिकांचा विरोध होत असेल तर त्यांचे समाधान करण्याचे काम सरकारचे आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन काम होणं गरजेचं आहे. मात्र जर लोकांना विश्वासात नाही घेतलं तर अनेक प्रश्न निर्माण होतात असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.