Ajit Pawar: अजित पवारांची मोठी खेळी, ‘जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर…’

0

मुंबई,दि.3: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. यानंतर आता अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. शरद पवारांच्या गटाकडून करण्यात आलेल्या कारवाईला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर आलं आहे. यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई झाल्याची घोषणा अजित पवारांनी केली. ते सोमवारी (3 जुलै) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवारांची मोठी खेळी | Ajit Pawar

अजित पवार म्हणाले, “मी माध्यमांमध्ये पाहिलं की, नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी असं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलं आहे. मी सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि पक्षाने निवडून दिलेला विधीमंडळ पक्षनेता आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याच्या संदर्भात कालच विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं आहे.”

पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच

“बहुसंख्य आमदार हे आमच्याबरोबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आहेत. देशपातळीवर नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहोत. आम्ही ही भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत. सुनील तटकरेंची प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे. आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतो आहोत,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही

अजित पवार पुढे म्हणाले, “काहींनी आमच्या विरोधात नोटीस वगैरे काढली आहे. मात्र, तो अधिकार कुणालाही नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याच बरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरच्या आमदारांचं भवितव्य कसं व्यवस्थित राहिल याची खबरदारी आम्ही घेत आहोत. कुणीही काहीही सांगितलं तरीही आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही.”

शरद पवारचं पक्षाचे अध्यक्ष: अजित पवार

आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

रविवारी सुनिल तटकरेंची नेमणूक केली, त्यात काही निर्णय घेतले आहेत ते सांगितलेच. एकाला प्रतोद आणि विरोधी पक्षनेते नेमलेलं आहे. मात्र हे काम विधानसभा अध्यक्षांचं असतं. ज्याची संख्या जास्त असते त्याची नेमणूक करत असतात. मात्र आमच्या आमदारांमध्ये भीती निर्माण व्हावी त्यासाठी केला जात आहे. यासंदर्भात बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. आम्ही पुढेही काम करत राहू, एनसीपीच्या बळकटीसाठी काम करत राहू, असे अजित पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here