मुंबई,दि.२: राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (२ जुलै) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, “आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आमच्याबरोबर जवळपास बहुसंख्य आमदार, सर्व पक्ष आहे. मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. मंत्रिमंडळात पुढे पुन्हा विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे.”
वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो…
“अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो. सध्या देशाची आणि राज्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं मत आलं,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ९ वर्षे देशाला मजबुतीने पुढे नेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असं मत आलं. सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त बैठका होत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळ्या राज्यात वेगळी परिस्थिती आहे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.