राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आलेल्या धमकीवरून अजित पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.९: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आलेल्या धमकीवरून अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “चूक करणाऱ्याला अटक करत कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “सौरभ पिंपळकर नावाच्या ट्वीटर अकाउंटवर धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या ट्वीटरच्या बायोमध्ये भाजपाचा कार्यकर्ता असा उल्लेख आहे. पण, तो खरंच भाजपाचा कार्यकर्ता आहे का? याची माहिती नाही. विचारांची लढाई विचारांनी करू. प्रत्येकाला आपलं विचार आणि मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे. त्याचा गैरवापर कशाला करायचा.”

“राज्यातील आणि राष्ट्रीय नेत्याबद्दल अशाप्रकराचे बदनामीकारक लिखाण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला आहे. मात्र, सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड कोण आहे? कुणी हे करायला भाग पाडलं? त्याच्या मोबाईलवरून कोणाशी संपर्क झाला, हे कळलं पाहिजे,” असेही अजित पवारांनी सांगितलं.

“प्रत्येकाने आपला पक्ष वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. पण, कारण नसताना इतर नेत्यांची बदनामी, चारित्र्यहनन आणि जनमाणसातील प्रतिमा मलिन करायची हे प्रकार वाढत आहेत. हे दुर्देवी असून, याचा धिक्कार करतो. पोलिसांनी कठोर कारवाई करत, चूक करणाऱ्याला अटक करावी,” असेही अजित पवारांनी म्हटलं.

अजित पवार पुढे म्हणाले की, निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही. पवार साहेबांना सोशल मिडियावरुन देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी, या मागणीचा मी पुनरुच्चार करतो, असे अजित पवार यांनी संगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here