मुंबई,दि.९: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शरद पवारांना ही धमकी देण्यात आली असून “तुमचाही दाभोलकर होणार”, अशी पोस्ट या अकाऊंटवर करण्यात आली आहे.
तसेच, या धमकीबरोबरच शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. यासंदर्भात गृहविभागानं लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही घडामोडींमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातही औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर किंवा पोस्टर्सवर लावल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यासंदर्भात त्या त्या ठिकाणी पोलिसांनी तपास सुरू केला असून काही आरोपींवर कारवाईही केली आहे. मात्र, याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळाले. वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय नेतेमंडळींनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवारांना आलेली धमकी हा याच तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम असल्याचं आता बोललं जात आहे.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
शरद पवारांना धमकी आल्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. “गृहमंत्रालयाने याची नोंद घ्यावी. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात माहिती दिली आहे. शरद पवारांना ज्या पद्धतीने ही धमकी आली आहे. ते दुर्दैवी आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. धमकी देणाऱ्या ट्वीटमध्ये शरद पवारांना शिवीगाळ करून पुढे “तुमचाही दाभोलकर होणार”, असा उल्लेख करण्यात आला. यासंदर्भात आता राजकीय वर्तुळातून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.