Lok Sabha-Assembly Election: महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

0

नवी दिल्ली,दि.२८: Lok Sabha-Assembly Election: महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात जवळपास सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गाठीभेटींचे सत्र वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकानंतर विधानसभेच्या निवडणुका होतात. मात्र, लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे तसे संकेत मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र? | Lok Sabha-Assembly Election

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून केली जात असल्याचे सांगितले जात आहे. 

निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा…

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. ज्यात त्या त्या जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक विभागातील सर्वच कर्मचारी-अधिकारी सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहेत. तसेच या काळात त्यांच्याकडे इतर कोणतेही इतर कामे दिले जात नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, २०२४ मध्ये लोकसभेच्या आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष तयारी करत आहे. राज्यातील एकंदरीत चित्र पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्याही निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोग त्याच दृष्टीने तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here