नवी दिल्ली,दि.२८: भाजपा नेत्याने संसद भवनाच्या उद्घाटनाला शरद पवार उपस्थित न राहण्याचे कारण सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या भव्य सोहळ्यात हवन-पूजा करण्यात आली. तसेच सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. मात्र, १९ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. यावरून भाजप नेत्याने शरद पवारांवर टीका केली असून, यामागील राजकारण सांगितले आहे.
संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचले. या महत्त्वाचा निर्णयात संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतले नाही. संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. पण, राष्ट्रपतींनी संसदेचे उद्घाटन करावे, हे सुद्धा मान्य करण्यात आले नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. याला भाजप नेते राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तर शरद पवार नवीन संसदेच्या उद्घाटानाला आले असते
शरद पवार यांना संसदीय कामकाजाचा साठ वर्षांचा अनुभव आहे. या साठ वर्षांमध्ये त्यांनी अनेकदा सत्ता भोगली आहे. सत्तेमध्ये असताना विरोधी पक्षाची भूमिका काय असते आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका काय असते हे शरद पवार अतिशय चांगल्या पद्धतीने जाणतात, असा पलटवार करत, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणे गरजेचे होते. कदाचित इतर पक्षाच्या दबावामुळे ते सहभागी झाले नाहीत. अन्यथा शरद पवार नक्की या कार्यक्रमात सहभागी झाले असते, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या नव्या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी विधीवत पूजन-हवन केले. यावेळी तामिळनाडूतील अध्यानम संतांनी वैदिक मंत्रोच्चार केला. तसेच लोकसभा सभागृहात बसवल्या जाणाऱ्या सेंगोलचे पूजन केले.