ठाणे,दि.१७: Kedar Dighe On Ayodhya Poul: ठाणे शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक आणि मारहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात पुन्हा एका ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर शुक्रवारी ( १६ जून ) हल्ला करण्यात आला आहे. कळव्यात एका कार्यक्रमाला शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांना बोलावण्यात आलं होतं. पण, तेव्हा अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आली आहे. तो ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून, षडयंत्र रचण्यात आलं होतं, असा आरोप पौळ यांनी केला.
हेही वाचा Ayodhya Poul: ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक आणि मारहाण
अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे (Kedar Dighe) यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
केदार दिघे म्हणाले… | Kedar Dighe On Ayodhya Poul
“मला वाटतं, हे षडयंत्र आहे. अयोध्या पौळ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलखोल करत असतात. पक्षाचा कार्यक्रम असल्याचं सांगून पौळ यांना बोलवण्यात आलं. तिथे आल्यावर आपल्या पक्षाचा कार्यक्रम नसल्याचं पौळ यांच्या लक्षात आलं. नंतर नको त्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, हे दुर्दैवी आहे,” असं केदार दिघे म्हणाले.
“पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर पोळ यांच्यावर पुन्हा हल्ला करण्यात आला. कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती पावले उचलली पाहिजेत. अशा पद्धतीने षडयंत्र रचून कोण काही करत असेल, तर त्यांच्यावर ठोस अशी कारवाई केली पाहिजे,” असं केदार दिघे यांनी म्हटलं.
“ज्या पक्षाचा कार्यक्रम नाही, त्याचा बॅनर पाठवून निमंत्रण दिलं गेलं. तिथे आल्यावर पक्षाचा कार्यक्रम नसल्याचं लक्षात आलं. पण, समोरील लोकांचं असलेले उदिष्ट चुकीचं होते. अशा प्रकारच्या षडयंत्राला कोणी बळी पडू नये,” असं आवाहनही केदार दिघे यांनी केलं आहे.