मुंबई,दि.१७: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. जवळपास दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी फूट पडली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षातला मोठा गट सरकारमध्ये सामील झाला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमातून शरद पवारांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे राष्ट्रावादीच्या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना दिसत आहे. दुसरीकडे अजित पवार व शरद पवारांची पुण्यात भेट झाल्यावरून तर्क-वितर्क चालू झाले आहेत. त्यासंदर्भात आता जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
शरद पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर मराठवाड्यात शरद पवारांची ही पहिलीच जाहीर सभा आहे. बीडच्या महालक्ष्मी चौकातून रॅली काढली जाईल. बीडमध्ये होणाऱ्या या सभेत शरद पवार नेमकी काय भूमिका मांडणार? अजित पवार गटात गेलेल्या धनंजय मुंडेंना ते सुनावणार का? याची उत्सुकता बीडसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पोहोचलेल्या जितेंद्र आव्हाडांनी टीव्ही ९ शी बोलताना पुण्यातील भेटीवरून अजित पवारांना टोला लगावला आहे.
ज्याला तलवार चालवता येते…
“८३ वर्षांचा माणूस युद्ध करायला निघाला आहे. युद्ध करणाऱ्याला वय नसतं. ज्याला तलवार चालवता येते, तो युद्ध करतो. मग तो १६ वर्षांचा मुलगा असो किंवा १०० वर्षांचा तरुण असो. युद्ध करण्यासाठी जिद्द मनात लागते”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“शरद पवारांनी निवृत्ती घेऊन घरी बसावं असं सांगणंच चुकीचं आहे. निवृत्त हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. म्हणून ते शरद पवार आहेत. शरद पवारांना निवृत्त व्हा असं कोण सांगणार?” असं आव्हाड यावेळी म्हणाले.
शरद पवारांना ऑफर देणं हा या दशकातला सर्वात मोठा…
दरम्यान, अजित पवारांनी पुण्यातील भेटीदरम्यान शरद पवारांना केंद्रात मंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यावरही जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवारांना ऑफर देणं हा या दशकातला सर्वात मोठा विनोद आहे. ज्या माणसानं अनेकांना ऑफर्स देऊन त्यांची आयुष्यं घडवली, त्यांना तुम्ही ऑफर देणार? हा बालिशपणा आहे. कुणी मला भेटायला आलं, तर समोर आल्यावर माणुसकीच्या दृष्टीने आपण भेटतो. कुणी नाकारतं का? अतिथी देवो भव: म्हणणारी आपली संस्कृती आहे. त्यानुसार आपण वागतो. काळ जसा जात जाईल, तसं तु्म्हाला कळत जाईल”, असं सूचक विधानही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केलं.