बीड,दि.१७: आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. बीड हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. अशात आज शरद पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. बीड हा तसा पाहिला तर मुंडेंचा बालेकिल्ला आहे, यामुळे शरद पवारांसोबत एक दोन पदाधिकारी सोडले तर इतर सर्व अजित पवारांसोबत आहेत. अशातच शरद पवारांच्या स्वागतासाठी अजित पवारांचे बॅनर लागल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे.
शरद पवारांच्या स्वागताला लागले अजित पवारांचे बॅनर
बीडमध्ये अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भावनिक साद घालण्यात आली आहे. याच आशयाचे बॅनर सध्या बीडमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅनरवर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचेही फोटो आहेत. आणि यातून कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या..! अशी भावनिक साद पवारांना घालण्यात आली आहे.
आज शरद पवार यांची बीडमध्ये सभा होते आहे. आणि सभेपूर्वीच हे बॅनर पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. मात्र, आज अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या भव्य स्वागताचे देखील नियोजन करण्यात आले आहे.