मुंबई,दि.6: माझी नियुक्ती जर बेकायदेशीर असेल तर माझ्या सहीच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आमदार बेकायदेशीर ठरणार का? असा सवाल आज राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटाला विचारला. अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) आज निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद करताना जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदाची निवड ही बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता.
“…तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर ठरणार का?” जयंत पाटील
माझी नियुक्ती नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले. जर मी बेकायदेशीर असेल उत्तर महाराष्ट्रातून निवडून आलेले सगळे आमदार देखील बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव दिसतो. मी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेलो आहे, मी निवडून आल्यानंतर प्रफुल पटेल यांनीच मला पत्र दिले असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
संख्याबळाबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील, कालच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आहे, त्यामध्ये 24 राज्यांपेक्षा जास्त अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला. पहिल्यांदा ही जेव्हा घटना झाली तेव्हा या 24 लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. पण यानंतर अजित पवार गटाने जर कोणाला नियुक्ती दिली असेल आणि त्यांचे त्यांना समर्थन असेल, निवडणूक आयोगाने पूर्वी अध्यक्ष कोण होते हे विचारून घेऊन निर्णय द्यावा.
…तर शंका निर्माण होते
25 वर्षे तुम्ही पवार साहेबांच्या सोबत काम केलं, पंचवीस वर्षानंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे, इतक्या उशिरा का लक्षात आले? असा सवाल जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला केला आहे. पक्षांतर्गत निवडणुका ज्यावेळी झाल्या त्या वेळेस असा प्रश्न कोणी विचारला नाही असंही ते म्हणाले.
निवडणूक आयोगासमोर आमचे वकील मांडतील, जास्त लोकांमध्ये बोलण्यात अर्थ नाही असं जयंत पाटील म्हणाले. निवडणूक आयोग राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, चिन्ह गोठवण्याचा प्रश्न येत नाही कारण पक्ष आणि चिन्ह शरद पवार साहेबांचं आहे. एखाद्याने उद्या भाजपच्या चिन्हाबद्दल प्रश्न उपस्थित केली तर ते तुम्ही गोठवणार का? शरद पवार संस्थापक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या पक्षाला आतापर्यंत कोणीही चॅलेंज केलेले नाही. त्यांना सर्वांनी हात उंचावून सर्वाधिकार दिलेले होते. त्याचे क्लिप सर्वांकडे आहेत. चिन्ह गोठवणे हे अन्यायकारक होईल. चिन्ह गोठण्याची एक पद्धत आहे पण आमच्या वकिलांनी सांगितले की चिन्ह गोठवू नका.
पवार साहेबाच्या कार्यशालीमधून हे लोक मोठी झाली आहे, तीच लोक आता पवार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल आक्षेप घेत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. घरातला लहान मुलगा जेव्हा मोठा होतो आणि त्याला स्वतंत्र व्हायचं असतं तेव्हा तो स्वतःच घर बांधतो, तो घरातून वडिलांना काढत नाही, यातच सगळं आले असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.