सोलापूर,दि.16: शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली. यानंतर अनेकांनी या कारवाईचा निषेध केला. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांना काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाच्या नेत्यांनी भेटून निषेध व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी यांनी समक्ष भेटून या कारवाईचा निषेध व्यक्त केला असून सूडबुद्धीने कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेतकऱ्यांचा कारखाना उध्वस्त करणाऱ्यांना घरी बसवू
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी प्रशासनाकडून पाडण्यात आल्याने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांना धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी जाऊन फोन लावण्यास सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी धर्मराज काडादी यांच्याशी बोलताना मी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आपल्या सदैव पाठीशी राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा कारखाना उध्वस्त करणाऱ्यांना घरी बसवू असे सुद्धा अभिवचन दिले.
चिमणी पाडकामाची कारवाई तुघलगी पद्धतीने केली होती याची माहिती काल नाना पटोले यांनी विजयकुमार हतुरे यांच्याकडून घेतली होती. आज विजयकुमार हत्तुरे यांना धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी जाण्यास सांगून त्यांना धीर देण्याचे काम पटोले यांनी केले.
नाना पटोले यांचे सोलापूर वरचे लक्ष कायम
यापूर्वी कुंभारी येथील एमआयडीसी व्हावी यासाठी उद्योग मंत्र्यांना पत्र दिले होते. आता यानंतर श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पडल्याने नाना पटोले यांनी फोन केल्याने सोलापूर वर लक्ष अधिक असल्याचे दाखवून दिले.