अपघात रोखण्यासाठी शासकीय कार्यालयात हेल्मेटसक्ती आवश्यक: निवासी जिल्हाधिकारी शमा पवार

0

सोलापूर,दि.12: हेल्मेटसक्ती: दुचाकी वाहनांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून, ते कमी करण्यासाठी शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करणे आवश्यक आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने व स्वाक्षरीने स्वतंत्र आदेश काढले जातील, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी आज येथे केले.

हेल्मेटसक्ती

नूतन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह पोलीस विभाग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह समितीचे सदस्य व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री महोदयांनी पालखी मार्गाच्या पाहणीदरम्यान केलेल्या सूचनांवर 20 जूनपूर्वी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी, असे सूचित करून शमा पवार म्हणाल्या, यामध्ये पालखी मार्गांवरील रस्त्यांची कामे पूर्ण करणे, महिला वारकऱ्यांसाठी स्नानगृहे व विसावा ठिकाणी मंडप, साईडपट्ट्यांची कामे तात्काळ पूर्ण करावीत या बाबींचा समावेश आहे. तसेच, महामार्गांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांचे दिशादर्शक फलक व वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे माहिती फलक दर्शनी भागात लावावेत, असे त्या म्हणाल्या.

या बैठकीत आषाढी वारीसाठी उपाययोजना करणे, सोलापूर जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांची संख्या, त्यांची दुरूस्ती व सुधारणा याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

सर्व शासकीय कार्यालय आणि शैक्षणिक संस्था या ठिकाणी…

दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीच्या पार्श्वभूमिवर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेकरता फलकाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या फलकावर वारकऱ्यांनी रस्त्यावरून चालताना फुटपाथचा वापर करावा तसेच फुटपाथ नसलेल्या ठिकाणी ज्या दिशेने वाहने येतात, त्या दिशेने चालावे जेणेकरून येणारे वाहन वारकऱ्यांना दिसेल असा संदेश देण्यात आलेला आहे. या फलकाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम जसे सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, दारू पिऊन वाहन चालवू नये, हेल्मेटचा वापर करावा, सीट बेल्टचा वापर करावा इत्यादी प्रकारचे संदेश देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय आणि शैक्षणिक संस्था या ठिकाणी मोटर वाहन सुधारित अधिनियम 2019 च्या कलम 129/194 डी अन्वये दुचाकी स्वारांना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे, हा संदेश फलकाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here