बेंगळुरू,दि.18: Gourav Vallabh On Nitin Gadkari: धर्मांतर विरोधी कायदा कर्नाटक काँग्रेस सरकारने रद्द केला आहे. नुकत्याच कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले होते. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शालेय पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवस संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि वीर सावरकर यांच्यावर आधारित धडे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भाजपकडून जोरदार विरोध होत आहे. भाजप सरकारच्या काळात हे धडे अभ्यासक्रमात टाकण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेस सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली. यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
काँग्रेस नेते गौरव वल्लभ म्हणाले की, ‘भारत आणि कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी हेडगेवार आणि सावरकर यांच्या विचारसरणीऐवजी भीमराव आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचे वाचन केले पाहिजे. महात्मा गांधींना मारणाऱ्या गोडसेची विचारधारा पुढे नेणाऱ्या सावरकर आणि हेडगेवारांची विचारधारा मुलांना शिकवू शकत नाहीत.”
काय म्हणाले होते नितीन गडकरी?
नितीन गडकरी शनिवारी (17 जून) नागपुरात वि.दा. सावरकर यांच्यावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “शालेय अभ्यासक्रमातून डॉ. हेडगेवार आणि वीर सावरकर यांच्याशी संबंधित अध्याय काढून टाकण्यात आले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापेक्षा वेदनादायक काहीही असू शकत नाही. सावरकर हे समाजसुधारक होते आणि ते आपल्यासाठी आदर्श आहेत,” असं गडकरी म्हणाले होते.
इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीची विचारधारा पुढे नेणार? | Gourav Vallabh On Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाच दिवसांपूर्वी महात्मा गांधींचा मारेकरी गोडसे हा भारताचा सुपुत्र असल्याचे म्हटले होते. ती विचारधारा आम्ही कशी पुढे नेणार? इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीची विचारधारा पुढे नेणार? सावरकरांची हेडगेवारांची विचारधारा भारताची विचारधारा नाहीये. पीएम मोदी आणि अमित शहांना नितीन गडकरी आवडत नाहीत, त्यामुळे गडकरी RSS ला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका गौरव यांनी केली.