सोलापूर,दि.२६: कर्ज मिळवून देतो असे सांगून घेतलेली रक्कम परत न करता दोघा भावांची सुमारे २८ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत मोहम्मद जावेद मोहम्मद युसुफ कुरेशी (वय ३२ रा. तेलंगी पाच्छा पेठ, श्रीनिवास टॉकीजजवळ) या व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अनिल श्रीराम, गीता अनिल श्रीराम, अनिकेत अनिल श्रीराम, जुबेर कुरेशी ऊर्फ बिट्टू व श्रीशैल मठपती यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी फिर्यादीस कर्ज मिळवून देतो असे सांगून फिर्यादीकडून साडेएकोणवीस लाख रुपये घेतले, परंतु कर्ज मंजूर न झाल्याने आरोपी अनिल श्रीराम याने त्याच्या नावावरील फ्लॅट फिर्यादी व त्याचा भाऊ मेहबूब यांच्या नावावर करून दिला. सदर फ्लॅट तारण ठेवून त्यावर कर्ज मंजूर करून घेण्यास सांगितले आणि सदर मंजूर कर्जाची रक्कम व सहा लाख इतकी रक्कम आरोपी अनिल याने फिर्यादीकडून घेतली. तसेच अन्य एक फ्लॅट फिर्यादीचा भाऊ मेहबूब याच्या नावावर करून दिला.
परंतु दोन्ही फ्लॅट हे भाडेकराराने दिले असून सदर फिर्यादिस देण्यास भाडेकरी नकार देत आहेत. अशा पद्धतीने आरोपींनी साडेपंचवीस लाख रुपये आणि फ्लॅट खरेदी खर्चाकरिता दिलेले दोन लाख ४० हजार रुपये अशी एकूण २७ लाख ९० हजार रुपयांची रक्कम फिर्यादीकडून घेतली आहे. ही रक्कम परतफेडीसाठी अनिल याने फिर्यादीस दिलेला धनादेश बँक खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने वटला नाही.
अशाप्रकारे आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या भावाची रक्कम परत न करता फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हे करीत आहेत.