राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना अटक

0

सोलापूर,दि.15: शिवपार्वती लॉजवरील वादाचे रूपांतर हाणामारीत आणि त्यानंतर जातिवाचक शिवीगाळीत झाल्याने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी महापौर मनोहर सपाटे (Manohar Sapate) व त्यांचे पुत्र बाबासाहेब सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्‍त माधव रेड्डी यांनी दिली. मनोहर सपाटे अटकेत असून बाबासाहेब सपाटे हा फरार झाला आहे.

यातील फिर्यादी किरण साळवे हे सपाटे यांच्या शिव-पार्वती लॉजवर मॅनेजर आहेत. गुरुवारी (ता. 14) पहाटे एक-दोनच्य सुमारास ही मारहाण झाली. त्याची माहिती समजताच सपाटे हे त्या ठिकाणी पोचले. त्यांनी दोघांचे भांडण सोडवले. शुक्रवारी सकाळी आपण बघू, असेही त्यांनी सांगितले होते. तरीपण साळवे यांनी थेट दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीची फिर्याद दिली. खरा वाद हा साळवे व बाबासाहेब सपाटे या दोघांत झाला होता, असे बोलले जात आहे. त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्या वेळी बाबासाहेब सपाटे यांनी साळवे यांना जातिवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर किरण साळवे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 14) धाव घेतली.

बाबासाहेब सपाटे याने जातिवाचक शिवीगाळ केली, असे साळवे यांनी पोलिसांना सांगितले. त्याचबरोबर या गुन्ह्यात मनोहर सपाटे यांचेही नाव घेतले गेले आहे. शुक्रवारी (ता. 15) फौजदार चावडी पोलिसांनी मनोहर सपाटे यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून बसवले होते. सपाटे यांना अटक केल्याचे समजताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, कॉंग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले, कॉंग्रेस युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, माऊली पवार, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह मराठा समाजातील नेते व सपाटे समर्थकांची गर्दी झाली होती. त्या सर्वांनी सहाय्यक पोलिस आयुक्त माधव रेड्डी, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांची भेट घेतली. मात्र, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी सपाटे यांना न्यायालयात नेल्याचे समजते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here