Mahakumbh: महाकुंभमेळा परिसरात लागली आग

0

प्रयागराज,दि.19: Mahakumbh: प्रयागराज महाकुंभमेळा परिसरात रविवारी आग लागली. सेक्टर-19 मधील अखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये ही आग लागली आणि येथून सर्वत्र पसरली. आगीत अनेक तंबू आणि त्यात ठेवलेल्या वस्तू जळून खाक झाल्या. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, आधी सिलिंडरला आग लागली आणि नंतर ती पसरली. आगीने उग्र रूप धारण केल्यानंतर वेगवेगळ्या तंबूत ठेवलेल्या सिलिंडरमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले. सुमारे आठ ते नऊ सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

आगीत सुमारे 15 ते 18 तंबू जळून खाक झाले. आखाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी भास्कर मिश्रा म्हणाले, ‘महाकुंभमेळ्यात सेक्टर 19 मध्ये दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने शिबिरांमध्ये भीषण आग लागली.’

प्रयागराजचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, दुपारी 4.30 वाजता सेक्टर 19 येथील गीता प्रेसच्या तंबूला आग लागली. ते म्हणाले, ‘कोणत्याही जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभातील आगीच्या घटनेची दखल घेतली आहे, त्यांच्या कार्यालयाने सांगितले की, वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. 

महाकुंभ 2025 च्या अधिकृत हँडलवरून X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘खूप दुःखद! महाकुंभातील आगीच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रशासन तात्काळ मदत आणि बचाव कार्य करत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही गंगा मातेकडे प्रार्थना करतो. 

उत्तर प्रदेशचे एडीजी भानू भास्कर म्हणाले, ‘आग विझवण्यात आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सर्वजण सुरक्षित आहेत. आगीचे कारण सिलिंडरचा स्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र या संदर्भात अधिक तपास करणे बाकी आहे. ते म्हणाले, ‘आम्हाला सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली होती. लोकांना बाहेर काढून आग विझवण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले, मात्र तपास सुरू आहे.

13 जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. 18 जानेवारीपर्यंत महाकुंभदरम्यान 7 कोटींहून अधिक भाविकांनी संगम त्रिवेणीत स्नान केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी 46.95 लाखांहून अधिक भाविकांनी स्नान केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here