शिर्डी,दि.19: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शपथविधीवरून गौप्यस्फोट केला आहे. शिर्डीत राष्ट्रवादी पक्षाचे शिबीर सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. हे सरकार अवघे 80 तास चालले होते.
पहाटेचा शपथविधी हे मोठे षडयंत्र होते, अजितदादांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी पहाटेचा शपथविधी षडयंत्र होते असे धनंजय मुंडे म्हणाले. मी दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, मात्र त्यांनी ते ऐकलं नाही, असं विधान मुंडे यांनी केलं आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
“पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं,” असं धनंजय मुंडे भाषणात म्हणाले.