मुंबई,दि.19: अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan)16 जानेवारीला पहाटे अडीचच्या सुमारास त्याच्या घरी झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. मुंबई पोलिसांचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना सांगितले की, ठाण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे त्याचे नाव आहे. प्राथमिक तपासानंतर आम्हाला असे पुरावे मिळाले आहेत ज्यावरून आरोपी बांगलादेशी वंशाचा असल्याचे आम्ही म्हणू शकतो. काही वेळाने त्याचे मेडिकल करून त्याला कोर्टात हजर करू. मुंबई पोलीस चौकशीसाठी आरोपींना न्यायालयाकडे रिमांडची मागणी करणार आहेत.
डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले की, आरोपींकडून कोणतेही वैध भारतीय दस्तऐवज सापडले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पासपोर्ट कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. 5-6 महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला आणि हाउस कीपिंग एजन्सीत कामाला होता. जेव्हा त्याला विचारले की आरोपी सैफच्या घरी आधीच आले होते का? याबाबत डीसीपी गेडाम म्हणाले की, अद्याप आमच्याकडे याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. सैफच्या घरात तो पहिल्यांदा चोरीच्या उद्देशाने घुसला होता, असे आम्हाला वाटते.
आरोपी शहजादने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, तो सैफ अली खानच्या घरात प्रवेश करत असल्याचे त्याला माहीत नव्हते. आरोपीने सांगितले की, त्याचा हेतू फक्त चोरी करण्याचा होता आणि त्यामुळेच तो घरात घुसला होता. अचानक सैफ अली खान समोर आला आणि त्याने अभिनेत्यावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. पोलीस मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादबद्दल अधिक माहिती गोळा करत असून तो बांगलादेशी नागरिक असेल तर तो अवैधरित्या भारतात कसा आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई पोलिसांनी संशयित हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटजवळील मेट्रो कन्स्ट्रक्शन साइटजवळील लेबर कॅम्पमधून अटक केली. तो झुडपात लपला होता. त्याने ओळख बदलली आणि बिजॉय दास या नावाने तो मुंबईत राहत होता.