सोलापूर,दि.22: एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणात डॅाक्टर माधव जोशी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यातील तक्रारदार यांच्या साई डायग्नोस्टिक लॅबला श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे कार्यान्वित असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निविदेद्वारे मिळालेले होते.
तक्रारदार यांच्या लॅबच्या विरोधात आलेल्या तक्रारी अर्ज हा पुढील चौकशीकामी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे, जिल्हा समन्वयक, डॉक्टर माधव जोशी यांच्याकडे होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने डॉक्टर माधव जोशी यांनी तक्रारदार यांना संपर्क साधून त्यांच्या लॅबचे कामाबाबत माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून तुमच्या बाजूने वरिष्ठांना अहवाल पाठवतो, असे सांगून तुमच्या लॅबच्या विरोधात मी अहवाल पाठवल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत केलेल्या कामाचे उर्वरित बिल निघणार नाही, अशी भीती दाखवून सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी आरोपी डॉक्टर माधव जोशी यांनी तक्रारदार यांच्याकडे रक्कम रु. 2,00,000/- ची मागणी केली. त्यानंतर सदर रकमेचा पहिला हप्ता म्हणून रक्कम रु. 1,00,000/- स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती.
डॉक्टर माधव जोशी हे तक्रारदार यांच्याकडे लाच मागत असल्याची तक्रारदाराची खात्री झाल्याने त्यांनी सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी डॉक्टर माधव जोशी यांच्याविरुद्ध रितसर तक्रार नोंदवलेली. त्यानुसार लाचेबाबतची सरकारी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, आरोपी डॉक्टर माधव जोशी यांनी तक्रारदार यांच्याकडे रक्कम रु. 2,00,000/- ची लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून रक्कम रु. 1,00,000/- स्वीकारणार असल्याचे सापळा कारवाई दरम्यान निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध पुढील लाचेसंदर्भातील सापळा रचण्यात आला.
त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून लाचेच्या पहिल्या हप्ताची रक्कम रु. 1,00,000/- ची लाच स्वीकारताना डॉक्टर माधव जोशी यांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
त्यावेळी आरोपी डॉक्टर माधव जोशी यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर जामिनाच्यावेळी ॲड. निलेश जोशी यांच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. जी. कटारिया यांनी आरोपी डॉक्टर माधव जोशी यांची रक्कम रु. 25,000/- च्या जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी यांनी काम पाहिले.