सोलापूर,दि.२४: कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात पुन्हा एकदा बळावण्याची शक्यता असून शासन निर्देशानुसार कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण काही ठिकाणी आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जात आहे. सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटमध्ये वाढलेली गर्दी पाहता मंदिर समितीकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे.
यानिमित्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना मास्कचे वाटप केले.
याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक कोळी म्हणाले, दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग आटोक्यात आला होता. पण त्याचवेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन या जागतिक आरोग्य संघटनेकडून पुढील काही वर्षातही कोरोना पुन्हा पुन्हा डोके वर काढेल असे जाहीर केले होते. या अनुषंगानेच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट उदयास आला आहे म्हणून या नव्या व्हेरिएंटला लढा देण्यासाठी सर्वांनी काही नियम पालन करणे गरजेचे आहे.
अध्यक्ष महेश इंगळे म्हणाले, स्वामी समर्थांच्या मंदिरात देशविदेशातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक येथील दर्शनाकरिता येत असतात. दररोज स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे-मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे,प्रथमेश इंगळे,विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.