मुंबई,दि.२३: आमदार अपात्र प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्र प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांच्या प्रमुखांना बोलावले जाऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री आपल्या दिल्ली भेटीत विधिज्ञांशी सविस्तर चर्चा केली.
दिल्लीहून परत आल्यानंतर शुक्रवारी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नार्वेकर म्हणाले, दिल्लीत माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. तसेच अनेक भेटीगाठी होत्या. त्यातील काही भेटी या कायदेतज्ज्ञांसोबत होत्या. आमदार अपात्रतेसंदर्भात जो कायदा आहे त्याच्यात परिस्थितीनुसार वेगवेगळे बदल होत असतात.
आमदार अपात्र प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मोठं विधान
आमदार अपात्रतेच्या बाबतीत मी सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याने अधिक बोलणे उचित ठरणार नाही. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. संविधानाने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिले आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही; परंतु घाईदेखील करणार नाही. सर्व नियम, कायदेशीर आणि संवैधानिक तरतुदी यांचे योग्यरीत्या पालन करूनच मी निर्णय घेईन, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.