“…त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील” आमदार बच्चू कडू यांचा भाजपला इशारा

0

मुंबई,दि.२२: आमदार बच्चू कडू यांनी भाजपला इशारा दिला आहे. राज्यात गेल्या वर्षी मोठा राजकीय स्फोट झाला. एकनाथ शिंदे सुरूवातील काही आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपासोबत सत्तास्थापना केली. शिवसेनेच्या याच सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता विचारणा केली जात आहे. न्यायालयाच्या घटनापीठाच्या आदेशाचा नार्वेकर यांनी आदर करायला हवा होता, अशा शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तीव्र रोष व्यक्त केला होता. त्यानंतर आता एक आठवड्याच्या आत याबद्दलचे मत स्पष्ट करावे असे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजितदादा मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

आमदार बच्चू कडू यांचा भाजपला इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवल्यास त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील, त्यांचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू इशारा दिला. आमदार बच्चू कडू म्हणाले की, असं होऊ शकत नाही, पण असं झाल्यास भाजपला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. कारण एकनाथ शिंदे यांचे देखील ५ ते १० टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास तुमचे काहीही प्लॅन्स कामी येणार नाहीत.

मराठा आरक्षणानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वच समाज आक्रमक झालेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. “सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवायला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. कारण ते विकासावर मते घेऊ शकले नाही. आता निवडणुकीत समाजाच्या आरक्षणावर आणि जातीचे मुद्दे घेऊन मते मागितली जाणार आहेत,” असे ते म्हणाले.

आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील कंत्राटी नोकरभरतीवरही आपले मत मांडले. ते म्हणाले की, एकीकडे लोक आरक्षण मागत आहेत तर दुसरीकडे कंत्राटी नोकरभरती केली जातेय. अधिकाऱ्यांच्या कामाचं कधी मूल्यांकन झालं का? तो किती काम करतोय, पगाराप्रमाणे तो काम करतोय का याचं मूल्यांकन झालं का? मग कंत्राटी कामगारांकडून अपेक्षा काय ठेवता?, असे बच्चू कडू यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here