सोलापूर,दि.13: महाराष्ट्रासह सोलापुरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी आज अपक्ष उमेदवार काडादी यांच्याबरोबर प्रचारात सहभाग घेतला. त्यांनी अपक्ष उमेदवार काडादी यांचा प्रचार सुरू केला आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत काडादींना पाठिंबा जाहीर केला होता.
मात्र माने यांच्या डोळ्याचे अॅापरेशन झाल्याने ते इतके दिवस प्रचारात सहभागी झाले नव्हते. मात्र आज माने यांनी सक्रीय सहभाग घेत नंदूर, सिनातेलगाव येथे प्रचार केला आहे. माने यांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहे. याचा मोठा फायदा काडादी यांना होणार आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे. विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघातून ते दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात धर्मराज काडादी उतरल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
माजी आमदार दिलीप माने यांनी धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने काडादी आणि माने समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ‘धर्मराज काडादींना दिलीप मानेंची साथ, बदलणार सोलापूर दक्षिणचा इतिहास’ अशी भावना काडादी यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.