
मुंबई,दि.२२: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या क्षणाक्षणाला धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात सामील झालेल्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या एका ‘घाई’मुळे आता मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. या दोघांच्या घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, उलट इतर सहा बंडखोर खासदारांची खासदारकीच धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘त्या’ दोन पत्रकारा परिषदा अन् सगळा खेळ बिघडला!
कायद्यानुसार, पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या एकूण खासदारांपैकी किमान दोन-तृतीयांश (2/3) खासदारांनी एकत्र येऊन गट सोडणे किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे बंधनकारक असते. ठाकरे गटाकडे सध्या ९ खासदार आहेत. नियम सांगतो की, यातील किमान ६ खासदारांनी एकाच वेळी, एकत्रितपणे पक्ष सोडत असल्याची घोषणा करणे गरजेचे होते.
पण, इथेच मोठा ट्विस्ट आला! खासदारांनी एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर घोषणा केल्या:
दुपारी: नागेश पाटील आष्टीकर यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली.
रात्री: ओमराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण शिंदे गटात जात असल्याचे जाहीर केले.
दोन्ही खासदारांनी वेगवेगळ्या वेळी आणि स्वतंत्रपणे पक्ष सोडल्याची घोषणा केल्यामुळे कायदेशीर तांत्रिकतेचा मोठा घोळ निर्माण झाला आहे.
बंडखोरांचा युक्तिवाद काय?
“मी उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्यावर नाराज नाही. पण सत्तेशिवाय मतदारसंघातील विकासकामे होत नाहीत. जनतेने विश्वासाने निवडून दिले आहे, त्यामुळे सत्तेत जाणे क्रमप्राप्त होते,” अशी प्रतिक्रिया नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली.
ठाकरे गटाच्या हाती लागलं कायदेशीर ‘कोलित’
तज्ज्ञांच्या मते, ६ जणांनी एकत्र येऊन अधिकृतपणे नवा गट स्थापन केल्याचे कोणतेही पत्र अद्याप समोर आलेले नाही, की लोकसभा अध्यक्षांकडून तसा कोणताही खुलासा झालेला नाही. त्यातच आष्टीकर आणि ओमराजे या दोघांनी वैयक्तिक पातळीवर घोषणा केल्यामुळे ठाकरे गटाला या दोघांवर स्वतंत्रपणे अपात्रतेची कारवाई करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
९ पैकी केवळ २ खासदारांनी टप्प्याटप्प्याने पक्ष सोडल्याचे दिसत असल्यामुळे दोन-तृतीयांश बहुमताचा नियम इथे लागू करणे शिंदे गटासाठी कायदेशीरदृष्ट्या डोकेदुखी ठरू शकते.
आता पुढे काय?
एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत सर्व बंडखोर खासदारांना सुरक्षितपणे आपल्या बाजूने खेचण्याचे नियोजन होते. मात्र, या दोन खासदारांच्या ‘अति घाई’मुळे संपूर्ण बंडखोर गटाची खासदारकी धोक्यात आल्याचे चित्र आहे. आता ठाकरे गट यावर काय पाऊल उचलतो आणि लोकसभा अध्यक्ष या तांत्रिक मुद्द्यावर काय निर्णय देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.







