मुंबई,दि.६: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थखाते अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) सोपवण्यात आलेले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा पक्षाकडे दिले जाईल असे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अधिवेशन संपूनही अर्थखात्याची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडेच राहिल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया (X) वर पोस्ट लिहीत फडणवीसांना दिलेल्या वचनाची जाहीर आठवण करून दिली आहे.
‘शब्दाला किंमत असते, तो पाळला तरच विश्वास वाढतो!’
अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, महायुती सरकार स्थापनेच्या वेळी अजितदादांनी अर्थखात्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली होती. दादांनंतर हे खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले जाईल, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळे या खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच नैसर्गिक हक्क आहे. दिलेला शब्द पाळणे ही केवळ राजकीय तडजोड नसून ती विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर सन्मानाची बाब आहे, असा पुनरुच्चार मिटकरी यांनी केला.
कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचे आवाहन
अजितदादांवर मनापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात सध्या वेदना आणि संभ्रम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच महायुती मजबूत करण्यासाठी जबाबदारीने साथ दिली आहे. त्यामुळे पक्षाचा स्वाभिमान आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी ठामपणे मांडायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.
महायुतीत नव्या चर्चांना उधाण
अमोल मिटकरी यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अर्थखात्याच्या ताब्यावरून महायुतीमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. महायुतीतील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणता निर्णय घेतात आणि वचनपूर्ती कधी करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








