सोलापूर,दि.18: ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांची कृपादृष्टी, कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांचे आशीर्वाद, ज्येष्ठ नेत्यांच्या शुभेच्छा व सोलापूरकर जनतेच्या मना मनातील उत्स्फूर्त प्रेम आणि विश्वास हीच आपली शक्ती आहे. या शक्तीच्या बळावरच आपण विधानसभेची ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास सोलापूर दक्षिण मतदार संघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी व्यक्त केला. सोमवारी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ‘गंगा निवास’ या आपल्या निवासस्थानी काडादी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आपले हे प्रेम वाया जाऊ देणार नाही
यावेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या प्रवासाचा काडादी यांनी थोडक्यात आढावा घेतला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना प्रचारासाठी मिळालेल्या केवळ दहा दिवसांच्या काळात इच्छा असूनही प्रत्येकाला भेटता आले नाही. मात्र, प्रचारादरम्यान आपण दिलेले प्रेम आणि आशीर्वाद पाहून मी भारावून गेलो आहे. आपले हे प्रेम वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच सोलापूरला हायटेक शहर बनवायचे आपले स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण मोठ्या मताधिक्याने मला विजयी करावे, असे आवाहन सोलापूर दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले. ते म्हणाले, गेल्या दहा दिवसांत प्रचारासाठी फिरत असताना सोलापूरकरांकडून मिळालेले प्रेम मी शब्दांत सांगू शकत नाही. घरोघरी सडा-संमार्जन करून, रांगोळी रेखाटून, औक्षण करुन माता-भगिनींनी केलेले स्वागत मी विसरू शकत नाही. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्याप्रमाणेच जनतेने माझ्या उमेदवारीला प्रतिसाद दिला. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी काहीही कामे केली नाहीत. त्यामुळे या भागाचा अपेक्षित विकास झाला नाही. रस्ते, पाणी, ड्रेनेज, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य सेवा अशा मूलभूत सुविधांपासून सोलापूरकर वंचित आहेत.
हे केवळ तुमचे प्रश्न नसून माझेही प्रश्न आहेत, याची मला जाणीव आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी आणि विकासाचा संकल्प तडीस नेण्यासाठी आपल्याच कुटुंबातील सदस्य होऊन मी काम करेन, अशी ग्वाही काडादी यांनी दिली. एखाद्या समाज अथवा धर्माच्या आधारावर राजकारण करणे कदापिही यशस्वी होणार नसल्याचे सांगतानाच सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचे सहकार्य व समन्वयातून काम करण्यास माझे प्राधान्य राहील. समाजातील शेवटच्या माणसाच्या विकासासाठी मी प्रयत्न करेन, असा विश्वास काडादी यांनी व्यक्त केला.
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी स्थापन केलेल्या संस्थांचे सोलापूरच्या शाश्वत विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना लौकिक टिकवून आहे. श्री सिध्देश्वर कारखान्याने दर जाहीर केल्यानंतरच इतर कारखाने आपला दर जाहीर करतात, याला महाराष्ट्र साक्षीदार आहे. यासोबतच शहरातील पहिली स्वायत्त शिक्षण संस्था म्हणून मान मिळवलेल्या संगमेश्वर महाविद्यालयासह श्री सिध्देश्वर शिक्षण संकुलाच्या विविध संस्था, महिला इंजिनीअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निकसह सर्व संस्था अतिशय चांगल्या पध्दतीने चालविल्या जात असून या संस्था महाराष्ट्रात नावारूपास आल्या आहेत. या अनुभवाच्या बळावर मी सोलापूरचे विधानसभेत प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, असा निर्धार काडादी यांनी व्यक्त केला.
मी एक नंबरवरच
संस्थात्मक जबाबदारीमध्ये आपण व्यस्त होतो. मात्र, सत्ताधारी भाजपवाल्यांकडून सातत्याने होणारा अन्याय सहन करत घरात बसणे मला शक्य नव्हते. म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलो. प्रचारादरम्यान सोलापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भाग आणि शहराशी संलग्न असलेल्या भागात मिळालेला प्रतिसाद विक्रमी असा होता. त्यामुळे आपला विजय निश्चित असून आपणच एक नंबरवर असल्याचे काडादी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
शरद पवार यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी
अपक्ष उमेदवारीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काडादी यांनी ‘शरद पवार यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी’ असल्याचा पुनरूच्चार केला. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या आग्रहामुळेच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो; परंतु, जागावाटप आणि इतर तांत्रिक बाबींमुळे आपण अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्याचे काडादी यांनी सांगितले.
कुटुंबातील सदस्य समजून मला आशीर्वाद द्या
सोलापूरकरांना भेडसावणार्या प्रश्नांची मला जाणीव आहे. तुमचे जीवन सुखकर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. तुमचे प्रश्न हे माझेच प्रश्न आहेत. आपल्या कुटुंबातीलच सदस्य होऊन मी काम करेन. मला आशीर्वाद द्या, अशी साद काडादी यांनी घातली.
शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचे प्रतीक असलेले ‘कॉम्प्युटर’ हे आपले निवडणूक चिन्ह आहे. हे चिन्ह पहिल्या मतदान मशीनवर सर्वात खाली 16 व्या क्रमांकावर आहे. या चिन्हासमोरील बटण दाबून विक्रमी मताधिक्याने मला विजयी करावे, असे आवाहन अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी शेवटी केले.