सोलापूर,दि.27: श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीवरून आपली भूमिका स्पष्ट केली. काल (दि.26) गंगा या निवासस्थानी सिध्देश्वर परिवार आणि काँग्रेस नेत्यांचा मेळावा झाला. यापूर्वी 17 नोव्हेंबरला सिध्देश्वर परिवाराची बैठक झाली होती. यानबैठकीनंतर राष्ट्रवादीचे (SP) अध्यक्ष शरद पवारांशी चर्चेनंतर धर्मराज काडादी यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अशातच शिवसेनेने (ठाकरे गट) 23 अॅाक्टोंबरला 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
जनभावना लक्षात घेऊन… काडादी
दक्षिण सोलापूरसह जिल्ह्यात सुरू असलेले द्वेषाचे राजकारण थांबले पाहिजे. कुरघोडीच्या वृत्तीमुळे तालुक्याचा खुंटलेला विकास मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या हितासाठी ज्येष्ठ नेत्यांच्या आणि तालुक्यातील प्रमुख नेते आणि जनतेच्या आग्रहामुळे आपण महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. आता जनभावना लक्षात घेतल्या पाहिजेत. शेवटी आपल्या उमेदवारीबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे हे जो काही निर्णय घेतील, तो स्वीकारू, अशा शब्दात सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, शरणराज काडादी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील, अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती संजीव पाटील, दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे, शेतकरी संघटनेचे नेते जाफरताज पाटील, अखतरताज पाटील, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष भारत जाधव, श्री सिध्देश्वर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष मुनाळे, शिवानंद कोनापुरे, चिदानंद वनारोटे, माजी सभापती भीमाशंकर जमादार, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, प्रा. भोजराज पवार आदी उपस्थित होते.
सगळ्यांच्याच भावनांशी मी…
‘धर्मराज काडादी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. युवक कार्यकर्ते आणि समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या बैठकीत उपस्थित नेत्यांनी आक्रमक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. तोच धागा पकडून काडादी म्हणाले, सगळ्यांच्याच भावनांशी मी सहमत असेनच असे नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत. या भावना स्वाभाविक आहेत. गेल्या 10 वर्षांत मला खूप त्रास झाला. श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे त्यांना उत्तर देणे गरजेचे होते. चिमणीच्या प्रकरणात शरद पवार यांनी खूप मदत केली. मी पूर्वी इच्छुक नव्हतो. पवार यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढविण्यासाठी तयार झालो. तालुक्यातून आणि शहरातील मतदारांशी संवाद साधताना चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी आपल्या उमेदवारीचे स्वागत केले. पवार यांच्या भेटीप्रसंगी आपण राष्ट्रवादीचा अर्ज भरला. हे सगळे सहज घडले. परंतु महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत, याबाबत वरिष्ठांनी निर्णय घ्यावा, अशा शब्दात काडादी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मागे लागून उमेदवारी मागणे हे मला पटत नाही
बैठक बोलाविण्याचे प्रयोजन सांगताना काडादी म्हणाले, दबाव निर्माण करण्याचा उद्देशाने ही बैठक बोलाविण्यात आली नाही. आमचा तसा कोणताच उद्देश नाही. मात्र गेल्या दहा-बारा दिवसांत घडलेल्या घटनांचा खुलासा व्हावा, आपल्या परिवारातील सर्वांना वस्तुस्थिती समजावी म्हणून ही बैठक बोलाविण्यात आली. मागे लागून उमेदवारी मागणे हे मला पटत नाही. सर्वांच्या आग्रहामुळे मी निवडणुकीच्या तयारीला लागलो. नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे काडादी यांनी सांगितले. लोकांना त्रास देणार्यांचा आपण एकत्रिपणे लोकसभा निवडणुकीत पराभव केला. आमदारकीसाठी अथवा कोणत्याही पदाच्या अपेक्षेने मी महाविकास आघाडीचा प्रचार केला नाही.
संस्थात्मक कामात व्यस्त असतानाही चुकीची माणसे सत्तेवर येऊ नयेत व प्रणितीताई यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असलेल्या नेत्या लोकसभेत निवडून जाव्यात यासाठी आपण प्रयत्न केल्याचे काडादी यांनी सांगितले. दक्षिण सोलापूर तालुक्याला सर्वसमावेशक नेतृत्वाचा मोठा वारसा आहे. शेवटच्या माणसाच्या मदतीला येण्यासाठी ज्येष्ठ नेते वि. गु. शिवदारे, दी. शि. कमळे गुरूजी, ब्रह्मदेवदादा माने, आनंदराव देवकते यांच्यासारख्या नेत्यांनी आयुष्य वेचले आहे. संस्थात्मक काम करताना त्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवले होते. त्यांच्याप्रमाणेच सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्या समाजघटकांच्या सहभागातून तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी आपली उमेदवारी राहील. अशी ग्वाही काडादी यांनी दिली.
पाडापाडीच्या राजकारणात आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट करतानाच घोषणाबाजी आणि जल्लोष करणार्या कार्यकर्त्यांनाही काडादी यांनी संयमाचा सल्ला दिला. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही उद्रेक करू नये, असे आवाहन काडादी यांनी केले.
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी सोलापुरात काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेस रूजविण्यात आणि वाढविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. सोलापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी शहर विकासाचा पाया रचला. याशिवाय काँग्रेसचे पहिले आमदार म्हणून तत्कालीन अक्कलकोट-दक्षिण सोलापूर मतदारसंघातून ते विजयी झाले होते. नंतरच्या काळात कॉँग्रेसचे पहिले खासदार होण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. हा इतिहास आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस पक्ष रूजविण्यात आणि वाढविण्यात काडादी परिवाराचे योगदान महत्त्वाचे असल्याचे धर्मराज काडादी यांनी सांगितले.