केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

0

मुंबई,दि.२९: केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (Dharmendra Pradhan Controversial Statement on Shivaji Maharaj) भाजपा नेते अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसतात. अलिकेडच भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी आणि भाजपा नेते तथा महाराष्ट्राचे माजी खासदार भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा भाजपा नेत्याच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान गुजरातच्या नर्मदा येथील एका कार्यक्रमात म्हणाले, समर्थ रामदास नसते तर शिवाजी बनले नसते. या वक्तव्यामुळे शिवप्रेमी प्रधान यांच्यावर संतापले आहेत.

गुजरातच्या शालेय शिक्षण विभागाने नर्मदा येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला धर्मेंद्र प्रधान यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रधान म्हणाले, समर्थ रामदास नसते तर शिवाजी बनले नसते. शिवाजी बनवण्याची फॅक्टरी असलेले सर्व समर्थ गुरू इथे बसले आहेत. प्रधान यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण होऊ शकतो.

दरम्यान, यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. भानुसे म्हणाले, हे लोक जाणीवपूर्वक आणि सातत्याने असा वाद सुरू ठेवतात. बाबासाहेब पुरंदरे यांनी सर्वात आधी असा विषय माडंला होता, परंतु शेवटी त्यांनी याप्रकरणी माफी मागितली आणि मान्य केलं की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते.

शिवानंद भानुसे यांचे तीन प्रश्न

डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान जर म्हणत असतील की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत. तर आमचे त्यांना तीन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला १८ देशांमधून लोक आले होते. मग शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या वेळी रामदासांना कसे काय विसरले? दुसरा प्रश्न – रामदास हे गुरू होते तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्यासाठी गागा भट्टांना कशासाठी बोलावलं? तिसरा प्रश्न – जेव्हा ब्राह्मणांनी आणि तथाकथित प्रवृत्तीच्या लोकांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तेव्हा रामदासांनी त्या लोकांचा विरोध का केला नाही? रामदास तेव्हा कुठे होते?” भानुसे हे साम मराठीशी बोलत होते.

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते म्हणाले, शिवाजी महाराज आणि रामदासांची भेट झाल्याचे कोणतेही पुरावे इतिहासात सापडत नाहीत. केवळ एक पत्र सापडलं आहे. ज्यात रामदासांनी शिवाजी महाराजांकडे एका मठासाठी देणगी मागितली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here