धाराशिव,दि.१६: तालुक्यातील पाटोदा–करजखेडा परिसरात रविवारी दुपारी एका भरधाव बोलेरोने दोन कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात होंडा सिटी कारमधील एका ७० वर्षीय ज्येष्ठाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बोलेरोने (MH-45 AZ 5449) प्रथम समोर असलेल्या वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो रस्ता दुभाजक (कटडा) तोडून विरुद्ध दिशेला गेली आणि समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारला तिने जोराची धडक दिली. बोलेरो चालक मद्याच्या नशेत असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
मृतांची व जखमींची नावे
• मृत: जीवन वसंत पाटील (वय ७०)
• जखमी: नित्यानंद मोहन बुके (३५), मोहन बुके (५५), अर्जुन पटुळे (५५) आणि एक ४० वर्षीय अनोळखी पुरुष.
बचावकार्य आणि पोलीस तपास
अपघाताची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने तुळजापूर आणि त्यानंतर धाराशिव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या अपघातामुळे तुळजापूर–लातूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, जी पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून सुरळीत केली.
या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून बेंबळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.








