लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात मोठे वक्तव्य 

0

सोलापूर,दि.8: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोलापुरात (Solapur) मोठे वक्तव्य केले आहे. राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणांचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणी शिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार जय सिध्देश्वर स्वामी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे पाटील, शिवाजी सावंत, महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, ज्योती वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलै चे प्रति महा पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेही बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत. या योजनेविषयी कोणी कितीही काही सांगितले तरी आम्ही ही योजना बंद करणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशभरात लखपती दीदी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासन ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने योजना राबवत असून पहिल्या टप्प्यात राज्यात 25 लाख लखपती दिदी तयार करण्यात येणार आहेत, तर राज्यात 1 कोटी लखपती दीदी तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान एक लाख रुपये स्वतः कमवतील यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here