मुंबई,दि.२९: भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन अशी फडणवीसांची ध्वनिचित्रफीत शुक्रवारी रात्री प्रसारित झाल्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ‘मी पुन्हा येईन’ अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ध्वनिचित्रफीत प्रदेश भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वाश्रमीचे ट्वीटर) खात्यावरून प्रसारित झाली. यामुळे राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाऊ, असा निर्वाळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला.
‘मी पुन्हा येईन अशी फडणवीसांची ध्वनिचित्रफीत शुक्रवारी रात्री प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. नंतर ही ध्वनिचित्रफीत काढून टाकण्यात आली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सारवासारव करीत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असे स्पष्टीकरण दिले. फडणवीस यांनी आज या गोंधळावर स्पष्टीकरण देताना ‘एखाद्याला पुन्हा यायचे असेल तर तो चित्रफीत प्रसारित करून येतो का,’ असा सवाल करीत किती हा वेडेपणा आहे. डोके ठिकाणावर असले पाहिजे, असे मत मांडले.
मुख्यमंत्री शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांचा एकही दिवस कमी होणार नाही. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका होतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. .एखाद्या चित्रफितीवरून त्याचा विनाकारण वेगळा अर्थ लावणे चुकीचे आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला. आपल्याकडे १०५ आमदार असते तर सरकार बनविले असते, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांना उद्देशून लगावला होता.
त्यावर आपल्यात आणि शरद पवार यांच्यात हाच फरक आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. तसेच ज्यांच्या नेतृत्वाखाली ३०५ खासदार निवडून येतात त्या पंतप्रधान मोदी यांनी, ज्यांच्या नेतृत्वात चार खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतला हा पवारांचा दावा हास्यास्पद असल्याचा टोलाही फडणवीसांनी पवारांना लगावला.