Devendra Fadnavis On Alliance: ‘शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक आहे तर, राष्ट्रवादीशी…’ देवेंद्र फडणवीस

0

मुंबई,दि.१३: Devendra Fadnavis On Alliance: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक आहे. तर, राष्ट्रवादीशी असलेली युती ही राजकीय मैत्री आहे, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. ते भाजपाने आयोजित केलेल्या ‘महाविजय २०२४’ प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते.

आज देशात सगळे पक्ष एकत्र येऊन मोदी नको अशी भावना मांडत आहेत. मोदींनी काय केले देशाला ११ वरून ५ व्या क्रमांकावर आणले. गरीबी कमी केली, हे आयएमएफ म्हणतोय. जगात सर्वात जास्त नोकऱ्या य़ा भारतात तयार होताय़त. मोदींच्या नेतृत्वाने करून दाखविले आहे. आज सगळे लोक मोदींविरोधात येतायत तेव्हा असे म्हणून चालणार नाही, की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही. जे येतील त्यांना सोबत घेणार आहोत. आमचे दरवाजे खुले आहेत. एक गोष्ट सांगतो, काँग्रेसचा विचार चालणार नाही. तुष्टीकरणाचे विचार आहेत. आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही. एमआयएम, मुस्लिम लीगला सोबत घेऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On Alliance)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? | Devendra Fadnavis On Alliance

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले. तर, कुणी म्हणते घर फोडले. पण, याची सुरूवात कोणी केली? जनादेशाची हत्या करण्याचं काम २०१९ साली कुणी केलं? पक्ष फोडले, असं बोलणाऱ्यांना माझा सवाल आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार पवार हे काय छोटे नेते आहेत का? काल राजकारण आलेत का? की मी मोहिनी टाकली आणि माझ्यामागे येतील. ते विचारपूर्वक आले आहेत. जेव्हा-जेव्हा अन्याय होईल, त्या-त्यावेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील.”

भिवंडीतील पदाधिकारी मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ही जी तुष्टीकरणाची निती आहे, ज्यामुळे भारताचे विभाजन झाले. का भारत आणि पाकिस्तान दोन देश झाले. त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची निती ठेवली, यामुळे दोन देशांचा सिद्धांत मांडला गेला आणि देशाचे विभाजन झाले. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. आम्ही २२ पक्षांचे सरकार चालविले आहे. बावनकुळे काळजी करू नका, दुसऱ्यांचे स्वागत करताना तुमचे जे मनसुबे आहेत, तुमची जी तयारी आहे ती आम्ही कुठेही वाया घालवू देणार नाही, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले.

“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक आहे. ती २५ वर्षाची आमची मैत्री आहे. आम्ही एका विचाराने बरोबर आलेले लोक आहोत. राष्ट्रवादीशी आमची राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढील १० ते १५ वर्षात तीही भावनिक मैत्री होईल,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

भाजपाला १५२ जागा

सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच देऊ शकत नाही. जसे २०१९ मधील उत्तरे २३ मध्ये मिळाली, तशी ती २६ मध्ये मिळतील. शिवरायांनीच सांगितलेय की दगाबाजांना माफी नाही. १५२ आकडा हा बावनकुळेंमुळे आला की नाही मला माहिती नाही. शिवसेनेसोबतची युती १५१ मुळे तुटली होती. आदित्य ठाकरेंनी आकडा जाहीर केलेला आणि आम्ही एवढ्या खाली सीटा घेणार नाही असे म्हटले त्यामुळे झाले होते. फक्त एवढे सांगतो की तुम्हाला इतक्या सीट लढण्यासाठी नक्की देऊ की १५२ हा आकडा पूर्ण करता येईल. आपल्याला २८८ मतदारसंघात काम करायचे आहे, आपल्यालाही जिंकायचे आहे, आपल्या मित्रांनाही जिंकवायचे आहे. भाजपा बेईमान नाहीय, असे फडणवीस म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here