राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात

0

सोलापूर,दि.2: राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करण्यात आला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. शिवसेनेत मोठी मोठी फूट पडली आहे. आता, शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना राज्यात रंगला आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानतंर आता कायदेशीरपणे शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्याची तयारी सुरु केली आहे. तर, शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावाही आमचाच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नाव घेऊन सध्या शिंदे गटाचं राजकारण सुरू आहे. आता, शिवसेनेनं रोखठोकमधून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. सगळेच आनंद दिघे नसतात, काहीजण शिंदे असतात. शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठित खंजीर खुपसला, असे म्हणत धर्मवीर सिनेमाचा किस्साही रोखठोकपणे सांगितला आहे.

यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदार गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. दोघांकडून टीझरही लॉंच करण्यात आले आहे. शिंदे गट आम्हीच बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेत असल्याचा दावा करते आहे, तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गट गद्दार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता यावरूनच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आरोप ‘रोखठोक’मधून करण्यात आला आहे.

“शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो. पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात”, असा घणाघात ‘रोखठोक’ या सदरातून करण्यात आला आहे.

“हे डोके शिंदेंचे नाही”

“सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला. पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला”, असा आरोपही ‘रोखठोक’मधून करण्यात आला आहे.

धर्मवीर चित्रपटावरून शिंदेंवर टीका

महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here