सदोष मनुष्यवध प्रकरणात सहाय्यक फौजदाराची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.७: सदोष मनुष्यवधप्रकरणी सहाय्यक फौजदाराची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात हकिकत अशी की, सोलापूर – पुणे हायवेवर दि. १४-०९-२०१७ रोजी वडवळ येथे राहणाऱ्या फिर्यादी संदीप डोंगरे यांना फोनद्वारे माहित झाले की त्यांचा मावस भाऊ विजयकुमार नामदेव चव्हाण याच्या मोटार सायकलचा सिध्देश्वर हॉटेल, पाकणी, ता. उत्तर सोलापूर येथे अपघात झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच फिर्यादी संदीप डोंगरे व त्यांचा मित्र असे दोघेजण मोटार सायकलवर सोलापूर येथील अश्विनी हॉस्पीटल येथे जखमी विजयकुमार चव्हाण यास पाहण्यास गेले असता, तेथे फिर्यादी यांना त्यांचा मावसभाऊ विजयकुमार नामदेव चव्हाण हा अपघातात मयत झाल्याचे समजले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असणाऱ्या इसमाने फिर्यादी यांना सांगितले की, त्यांची शेती कोंडी येथे असून ते शेतातील सामान आणण्यासाठी मोटारसायकलीवरून कोंडीवरुन पाकणी येथे जात असताना सिध्देश्वर हॉटेलजवळील छोटया पुलापाशी आले असता पाठीमागुन आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या समोर असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली.

त्यानंतर त्या कारमधील व्यक्तीने त्या धडक दिलेल्या दुचाकीजवळ जावून पाहिले व तो व्यक्ती तेथून लगेच निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या सांगण्यानुसार गाडीचा नंबर पाहून तेथून जवळ असलेल्या टोलनाक्यावर काम करणाऱ्या त्यांच्या मित्रास त्या गाडीचा नंबर सांगून ती गाडी कोणाची आहे त्यास थांबवून ठेवण्यास सांगितले व तो गाडी नंबर माहित होताच टोलनाक्यावर काम करणाऱ्या इसमाने ती गाडी सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप यांची असल्याचे सांगितले व ते रोज याच रोडने मोहोळ ला ये-जा करतात असे सांगितले.

त्यानुसार दत्तात्रय रघुनाथ जगताप, वय ५० वर्षे, धंदा – सहाय्यक फौजदार यांच्याविरुध्द सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रमाणे संबंधित पोलीसांनी सदर गुन्हयामध्ये तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचा खटला सत्र न्यायाधीश, सोलापूर योगेश राणे यांच्याकडे चालला.

सदर खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण ७ साक्षीदार तपासले. सदर साक्षीदारांपैकी प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या साक्षीदाराची उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर यांनी सदर खटल्यातील अंतिम सुनावणी वेळी युक्तीवाद करतेवेळेस नकारात्मक युक्तीवादाचा वापर केला. त्यापोटी देशामध्ये गाजलेल्या सर्वोच्च न्यायालयातील दोन खटले संजीव नंदा व अॅलेस्टर परेरा यांचा आधार घेतला. तसेच सदरची घटना बघणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा कसा खोटा आहे याचेही अनेक दृष्टीकोनातून युक्तीवादादरम्यान विश्लेषण करण्यात आले.

तसेच सदर खटल्यातील टोलनाक्यावरील उपस्थित साक्षीदाराची उलटतपासणी अत्यंत महत्वाची ठरली व सदर मयताच्या प्रेताचा पंचनामा करतेवेळी पोलीस हजर असतानाही सदर फिर्यादीने त्या पोलीसांना सदर घटनेबद्दलची कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. त्यामुळे सदर घटनेच्या सत्यतेबाबत दाट शंका निर्माण होते असा युक्तीवाद करण्यात आला. सदरचा आरोपींतर्फे केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन यातील आरोपीची सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. संतोष आवळे, अॅड. राम शिंदे, अॅड. फैय्याज शेख, अॅड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here