Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना न्यायालयाचे समन्स

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना न्यायालयाचे समन्स

0

मुंबई,दि.28: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयानं शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावत 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर न्यायालयानं हे समन्स जारी केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना न्यायालयाचे समन्स

एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी जून 2022 या महिन्यात बंड केलं. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अशात 29 डिसेंबर 2022 या दिवशी सामनाच्या हिंदी आणि मराठी आवृत्तीत एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्या लेखात राहुल शेवाळेंचे दुबई आणि पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळे यांनी वकील चित्रा साळुंखेंच्या मार्फत 3 जानेवारी 2023 ला नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यानंतर एका महिलेने सोशल मीडियावर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारे हा लेख दिला असं उत्तर सामनाकडून देण्यात आलं होतं.

100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

या उत्तरानंतर शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला आहे. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शेवाळे यांनी सादर केला आहे.

शेवाळेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शिवसेना पक्षासाठी काम केलेलं आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर शेवाळे यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यानंतर सामनामधून त्यांचा पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्याचा आरोप करत त्यांचे पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे शेवाळेंना त्यांच्या निकटवर्तीयांकडून विविध प्रश्नांना सामोरं जावं लागलं, जे अतिशय अपमानास्पद असल्याचा दावा शेवाळेंच्यावतीने ॲड. चित्रा साळुंखे यांनी केलाय. त्याची दखल घेऊन शिवडी कोर्टानं सामनाशी संबंधित असल्यानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 14 जुलै रोजी न्यायालयापुढे हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.