Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती

0

नवी दिल्ली,दि.१०: Corona Third Wave In India: भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले होते. नंतर निर्बंध शिथिल करण्यात आले. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) देशात कोरोनाची तिसरी लाट आली होती. देशात कोरोनाची तिसरी लाट धडकल्यानंतर रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. मात्र, आता कोरोनाचा ग्राफ वेगाने खाली येत असून तिसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अग्रवाल (Lav Agarwal) यांनी आज याबाबत माहिती दिली. दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत ८० टक्क्यांनी घट झाली आहे. तिसऱ्या लाटेत २१ जानेवारी रोजी ३ लाख ४७ हजार २५४ रुग्णांची नोंद झाली होती. आता हा आकडा ६६ हजार ८४ इतका खाली आला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.

अमेरिका, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांत कोरोनाचे रुग्ण वेगाने कमी होत असून भारतातही रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. देशात गेल्या आठवडाभर दररोज सरासरी ९६ हजार नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ६६ हजार ८४ नवे रुग्ण आढळले. सध्या देशात कोरोनाचे ७.९ लाख सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या चार दिवसांचा विचार केल्यास दैनंदिन रुग्णसंख्या एक लाखाच्या खालीच राहिली आहे.

देशात केरळमध्ये सध्या सर्वाधिक २ लाख ५० हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर महाराष्ट्र – ८६ हजार, तामिळनाडू – ७७ हजार आणि कर्नाटक- ६० हजार अशी सक्रिय रुग्णसंख्या आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ६१.२५ टक्के सक्रिय रुग्ण या चार राज्यांत आहेत, असे लव अग्रवाल यांनी नमूद केले. देशाचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट आता ४.४४ टक्के पर्यंत खाली आला आहे. ८ राज्यांत ५० हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत तर २१ राज्यांमध्ये हा आकडा १० हजारच्या खाली आला आहे, असेही त्यांनी नमूद केले. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत कोविड रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. देशातील १६० जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के यादरम्यान आहे. पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्ह्यांची संख्या २६८ वरून वाढून ४३३ इतकी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) आणि कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी यावेळी अधिक माहिती दिली. देशात कोविड स्थिती सुधारत आहे. रुग्णसंख्या उतरणीला लागला आहे. हे चांगले संकेत आहेत, असे त्यांनी सांगितले. केरळ, मिझोराम, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांत अजूनही कोविड पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचे सांगताना त्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here