नवी दिल्ली,दि.२४: देशातील अनेक राज्यांमध्ये वेगाने कोरोना (Corona) रुग्ण वाढत आहेत. देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा फैलाव होत असल्याने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. मात्र पंजाब, हरयाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अद्याप एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. मात्र येथील आरोग्य विभाग सतर्क आहे. देशभरात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात येत आहेत. तसेच सक्रीय रुग्णांचा आकडा वाढून ३७४२ झाला आहे. तसेच नव्या व्हेरिएंटबाबतची आकडेवारीही समोर येत आहे.
मागच्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे ३२२ नवे रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये १२८, कर्नाटकमध्ये ९६ आणि महाराष्ट्रामध्ये ३५ रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये १६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर उत्तर प्रदेशात कोरोनाचे १० सक्रिय रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गाझियाबादमध्ये ३, प्रयागराजमध्ये १, संभलमध्ये २ आणि लखनौ, गौतमबुद्ध नगर आणि बुलंदशहरमध्ये कोरोनाचा प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये शनिवारी कोरोनाचे १०४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही २७१ एवढी झाली आहे. संसर्गाचा दर वाढून ५.९३ टक्के एवढा झाला आहे. मात्र गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. एकूण २५८ व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर १३ जण रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यामधील सहा जणांवर आयसीयूमध्ये उपचार होत आहेत. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात १७५२ चाचण्या झाल्या आहेत. बंगळुरूमध्ये सर्वाधिक ८५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ म्हैसूर ७ शिमोगा ६, चामराजनगर आणि तुमकूरू येथे प्रत्येकी दोन तर मांड्या आणि दक्षिण कन्नड येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.