भाजपाने नितीन गडकरींना वगळण्यानंतर काँग्रेसने शेअर केला हा व्हिडिओ

0

दि.१९: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांच्या समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जेपी नड्डा आहेत. तर सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर बीएल संतोष हे सचिवपदी असणार आहेत. यात केंद्रातील कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आले आहे.

केंद्रातील एनडीए सरकारमधल्या कार्यक्षम मंत्र्यांमध्ये रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. गडकरींचा कामाचा वेग आणि त्यांची प्रशासनावरची पकड या गोष्टींची नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. गडकरींच्या कार्यक्षमतेचे अनेक दाखले देतानाच अनेकदा त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा सक्षम पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे अशा कार्यक्षम मंत्र्याचा सरकारमध्ये बोलबाला असणं ही फार साहजिक बाब मानली जाते. मात्र, भाजपानं नुकत्याच जाहीर केलेल्या पक्षाच्या संसदीय बोर्डामधून चक्क नितीन गडकरींना वगळण्यात आलं आहे. हे पाहून अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात आता काँग्रेसनं खोचक शब्दांत भाजपावर टीका करत नितीन गडकरींना वगळण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दरम्यान, याचवेळी भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीचीही घोषणा केली असून त्यामध्येही गडकरींचा समावेश नसल्याचं दिसून आलं आहे. या यादीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे.

भाजपाच्या या निर्णयामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं असून काँग्रेसनं नेमकं यावरच बोट ठेवत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ क्लिप शेअर करण्यात आली आहे. या क्लिपसोबत पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळेच गडकरींना वगळण्यात आल्याची पोस्ट करण्यात आली आहे.

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच, व्हिडीओ क्लिपमधून देखील या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

एकीकडे नितीन गडकरींच्या कार्यक्षमतेची चर्चा होत असताना दुसरीकडे त्यांना भाजपाच्या केंद्रीय समितीतून वगळण्यात आल्यामुळे विरोधकांना मात्र आयतं कोलित मिळाल्याचं बोललं जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here