CM Pramod Sawant | मुख्यमंत्री करणार अवयवदान; मूत्रपिंड, यकृत व बुबूळ करणार दान!

0
मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी,दि.२९: CM Pramod Sawant: मुख्यमंत्री अवयवदान करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अवयवदानाची शपथ घेतली असून मरणोत्तर ते आपले मूत्रपिंड, यकृत व डोळ्यातील बुबूळ (कोर्निया) दान करणार आहेत. गुरुवारी त्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अवयवदानाचे प्रमाणपत्रही मिळवले.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अवयवदान करत असल्याची माहिती दिली. प्रदेश भाजपच्या वैद्यकीय विभागाने काल हा अवयवदान नोंदणीचा कार्यक्रम घडवून आणला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर, सहप्रमुख स्नेहा भागवत व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते. भाजपतर्फे सेवा पंधरवड्यानिमित्ताने देशभर अवयव दानाबद्दलही जागृती केली जात आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री प्रमोद सावंत? | CM Pramod Sawant

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘मी अवयदानाची शपथ घेऊन प्रमाणपत्रही मिळवले आहे. आतापर्यंत गोमेकॉत अवयव दानाची चार प्रकरणे यशस्वी झालेली आहेत. सर्वांनी आपणहून पुढे येऊन अवयवदान करायला हवे. त्यासाठी फक्त अठरा वर्षे वयाच्या वर व्यक्ती हवी. आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी मतदारसंघांमध्ये तसेच प्रत्येक तालुक्यात अवयवदानाविषयी जागृती घडवून आणावी.

मूत्रपिंडाचे आजार एवढे वाढले आहेत की, गोव्यात दिवसाला एक तरी नवीन व्यक्ती डायलिसीससाठी पाठवावी लागते. डॉ. शेखर साळकर म्हणाले की, ब्रेन डेड व्यक्तीही पाच जणांना वेगवेगळ्या अवयव दानाने जीवदान देऊ शकते. संकेतस्थळावर नोंदणी करून प्रमाणपत्र घेतले तरी संबंधित व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी किंवा जवळच्या नातेवाईकांनीही संबंधिताच्या अवयव दानासाठी परवानगी द्यावी लागते व त्यानंतरच हे सोपस्कार पूर्ण होतात, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसवाय) कार्डाच्या कक्षेत आणणार आहे.

गोमेकॉत पूर्ववत नेत्रपेढी सुरू केली जाईल. तसेच हृदय आणि यकृत रोपणाच्या शस्त्रक्रियेची सोयही केली जाईल. राज्यात ४६ रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रत्येकाने अवयवदान केल्यास इतरांना जीवदान मिळू शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here