जयपूर,दि.9: एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात ठाकरे गटाला खिंडार पाडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा इतर राज्यात वळवला आहे. एकनाथ शिंदे यांनी आता थेट राजस्थानातच राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे. राजस्थानातील काँग्रेसचा एक बड्या आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या खास विश्वासू नेत्याने थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर महाराष्ट्रानंतर आता राजस्थानातही शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला मोठा धक्का
राजस्थानमध्ये वर्षाअखेर विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी तयारी केली आहे. अशातच काँग्रेसचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ‘लाल डायरी’मुळे राजेंद्रसिंह गुढा चर्चेत आले होते. आज (9 सप्टेंबर ) राजेंद्रसिंह गुढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
यावेळी झालेल्या जाहीर आणि भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुढा यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या हातात शिवधनुष्य देऊन त्यांना शिवसेनेत घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केलं. शिंदे यांनी सुरुवातीला राजस्थानी भाषेतून भाषण करत यावेळी उपस्थितांची मने जिंकली.
राजेंद्र गुढा यांचं शिवसेनेत स्वागत आहे. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राजस्थान ही वीरांची भूमी आहे. इथल्या जनतेला नमन करतो, अभिवादन करतो. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे महाराणा प्रताप यांचं नाव गाजलंय. राजस्थान आणि महाराष्ट्राचा स्वभाव गुण एकसारखा आहे. तो म्हणजे वीरता, शूरता, एकसमानता हा होय. आता या गुणाचं मिलन झालंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, एका विधानानंतर राजेंद्रसिंह गुढा यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलं होतं. 21 जुलैला काँग्रेसने मणिपूरमधील घटनेवरून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण, तेव्हा राजेंद्रसिंह गुढा यांना पक्षाला घरचा आहेर देत, राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनेवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
लाल डायरी
तेव्हा, राजेंद्रसिंह गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर 24 जुलैला राजेंद्रसिंह गुढा ‘लाल डायरी’ घेऊन विधानसभेत पोहचले होते. राजेंद्रसिंह गुढा यांनी दावा केला होता की, ‘लाल डायरी’त मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात आरोपांची पूर्ण लिस्ट आहे. त्यावेळी राजेंद्रसिंह गुढा यांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आलं होतं. तर, काँग्रेस मंत्री आणि आमदारांनी राजेंद्रसिंह गुढा यांच्यापासून ‘लाल डायरी’ हिसकावून घेतली होती. पण, लाल डायरीची दुसरी प्रत आपल्याकडं असल्याचा दावा गुढा यांनी केला होता.